Home Cities चोपडा तहसीलदारांच्या निलंबन मागणीसाठी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन

तहसीलदारांच्या निलंबन मागणीसाठी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन

0
14


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधात विविध तक्रारी, अवैध गौण खनिज उत्खननाकडे कथित दुर्लक्ष आणि प्रशासकीय कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या विभागीय चौकशीसह तात्काळ निलंबनाच्या मागणीसाठी सोमवारी चोपडा शहरात सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, पत्रकार आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

२९ जून रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततापूर्ण पद्धतीने मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक घेत आणि घोषणाबाजी करत शेकडो नागरिक तहसील कार्यालयावर धडकले. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. प्रांत अधिकारी अमळनेर हे अन्य प्रशासकीय कामामुळे आंदोलनस्थळी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वतीने नायब तहसीलदार रविंद्र जोशी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनातील सर्व मागण्या तातडीने शासनाकडे पाठविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आंदोलनानंतर झालेल्या सभेत विविध मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. यावेळी वक्त्यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांच्याविरोधातील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. प्रशासनाने या मागण्यांची वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, अशी भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती गोपाळराव सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, शशिकांत देवरे, अमृतराव वाघ, मगन बाविस्कर, दीपक सोनवणे, शुभम सोनवणे आदींनी सभेत आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वपक्षीय आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका संध्या महाजन, चोसाकाचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शालीग्राम पाटील, मनसे नेते अनिल वानखेडे, प्रदीप पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे सुनील बडगुजर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय शशिकांत कन्हैये, नंदलाल गोविंदा चौधरी, संजय कानडे, अजय पालीवाल, शशिकांत पाटील, भारतीय पत्रकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, भरत धनगर, किशोर दुसाने, अमोल राजपूत, समाधान पाटील, निलेश बारी, विकी सिंधी, तुकाराम पाटील, प्रल्हाद पाटील, शामकांत परदेशी, उर्वेश साळुंखे, प्रफुल्ल स्वामी, मुन्ना शर्मा, तुळशीराम पाटील, डॉ. रोहन पाटील, भाजपा गटनेते गजेंद्र जयस्वाल, गिरीश देशमुख, रणजीत देशमुख, लहूश धनगर, सुनील सोनगिरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाने निवेदन स्वीकारल्याने आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. तहसीलदारांविरोधातील मागण्यांवर शासन आणि महसूल प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता चोपडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound