धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे राज्य पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असतांना जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून आले आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून गुलाबभाऊंवर होत असलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज धरणगाव आणि पाळधी येथे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून ना. गुलाबराव पाटील यांना पाठींबा व्यक्त केला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाल्याचे दिसून आले.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे एकमुखाने समर्थन केले आहे. दरम्यान, या अनुषंगाने आज पाळधी आणि धरणगाव येथे आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आक्रोश व्यक्त केला. पाळधी शहरात दोन दिवसांपासूनच पदाधिकार्यांनी आपण ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत असल्याचे फलक लावले आहेत. तर आज सकाळी पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने शहरातून मोर्चा काढला. यात जोरदार घोषणाबाजी करून ना. गुलाबराव पाटील यांना पाठींबा दर्शविण्यात आला. यानंतर प्रमुख चौकात खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी खासदार राऊत यांचा निषेध करण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांना पाठींबा दर्शविणारी घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे म्हणाले की, गुलाबभाऊ पाटील हे लोकनेते असून ते चार वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे शिवसेनेसाठी अर्पण केले आहे. तर खासदार संजय राऊत यांच्यासारखे लोक राज्यसभेवर निवडून जाऊन गुलाबभाऊंसारख्या सच्च्या नेत्यांवर टीका करण्यासोबतच पक्षाला हानी पोहचवण्याचे काम करत आहेत. राऊत यांच्यात स्वाभीमान असेल तर त्यांनी पहिल्यांदा राज्यसभेचा राजीनामा देऊन लोकांमधून निवडून यावे, मगच भाऊंवर टीका करावी असे खुले आव्हान नन्नवरे यांनी याप्रसंगी दिले. याप्रसंगी नारायण सोनवणे, सचिन पवार, शरद कोळी, अनिल पाटील, शरद कोळी, चंदू माळी, प्रकाश पाटील, चंदन कळमकर, विजय पाटील, आबा महाजन, अनिल माळी, हाजी फिरोज खान, हाजी सुलतान पठाण, अहमद पठाण, डिगंबर माळी, गोकुळ पाटील, चंदू इंगळे, राजू माळी, शरद कासट, गोपाळ कासट, अनिल पंडीत, पप्पू शिंदे, धर्मेंद्र कुंभार, पप्पू पाटील आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, यानंतर धरणगाव येथे देखील शिवसैनिकांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत ना. गुलाबराव पाटील यांना पाठींबा व्यक्त केला. शिवसैनिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील मैदानात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध केला. मुर्दाबाद मुर्दाबाद..संजय राऊत मुर्दाबाब, गुलाबभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर दणाणून निघाला. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धिक्कार करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. संपूर्ण मतदारसंघ हा गुलाबभाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, गुलाबभाऊ आणि आम्ही अजून सुध्दा शिवसेनेतच आहोत. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. भाऊ हे सातत्याने लोकांमधून निवडून येत असतांना संजय राऊत यांच्या सारखी परजीवी बांडगुळे ही शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते गुलाबभाऊंसारख्या लोकनेत्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, गटनेते पप्पू भावे, मोती पाटील, पं.स. सदस्य मुकुंद नन्नवरे, भगवान महाजन, भैय्या महाजन यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.