धनंजय मुंडे राजीनामा द्या : भाजपची मागणी

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायिकेने शारिरीक शोषणाचे लावलेले आरोप आणि यावर मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची स्वीकारोक्ती दिल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

कालच बॉलिवुडची गायिका रेणू शर्मा हिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शोषणाचे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. तिने याबाबत ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार देखील दिली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रेणूची बहिण करूणा हिच्यासोबत आपण लिव्ह-इन मध्ये राहत होतो, तसेच तिच्यापासून आपल्याला एक मुलगा व मुलगी असल्याची स्वीकारोक्ती देत रेणूचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र त्यांनी विवाहबाह्य संबंधाची कबुली दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर महिला भाजपचा अध्यक्षा उमा खापरे यांनी देखील मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्‍चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा उमा खापरे यांनी या पत्रात दिला आहे.

Protected Content