शिवसेनेला भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून मनधरणीची आस ?

thakare and shaha

मुंबई, वृत्तसंस्था | भाजपाध्यक्ष अमित शहा हे ‘मातोश्री’ निवासस्थानी गेल्यास भाजप व शिवसेनेमध्ये निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा सहज सुटू शकतो, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. हरयाणात १० आमदार असलेल्या दुष्यंत चौटाला यांना सन्मानाने उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपने नमते घेतले आहे. खुद्द शहा यांनी निकालानंतर चौटाला यांची मनधरणी केली होती. मात्र, शिवसेनेच्या बाबतीत भाजपने वेगळे धोरण अवलंबले आहे. हेच शिवसेनेला खटकत असल्याची चर्चा आहे.

 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस उलटल्यानंतरही राज्यात सरकार स्थापनेची चिन्हं दिसत नाहीत. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या फार्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे, तर मुख्यमंत्रिपदाबरोबरच महत्त्वाची खाती सोडायलाही भाजप तयार नाही. मुख्यमंत्रिपद भाजप सहजासहजी सोडणार नाही, याची जाणीव सेनेलाही आहे. त्यामुळे काही महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याची सेनेची रणनीती आहे. अर्थात, त्यासाठी केंद्रीय नेत्यांनी त्यांची मनधरणी करावी, अशी सेनेची अपेक्षा असल्याचे पक्षातील सूत्रांकडून समजले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपचे वरिष्ठ नेते प्रत्येक कामासाठी ‘मातोश्री’वर धाव घेत. या भेटीगाठींनंतर लगेचच दोन्ही पक्षातील तणाव निवळत असे. मात्र, राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला दुय्यम स्थान देण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. मागील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची भीती दाखवून भाजपने सेनेला सत्तेत सहभागी होण्यास भाग पाडले होते. तसेच, खातीही तुलनेने दुय्यम दिली होती. सेना सत्तेत असली तरी सत्तेच्या नाड्या भाजपच्याच हाती होत्या. राज्याच्या राजकारणात डरकाळ्या फोडणाऱ्या सेनेच्या वाघाला हे निमूटपणे सहन करावे लागत होते.

आता परिस्थिती वेगळी आहे. भाजपच्या जागा मागील वेळेपेक्षा कमी झाल्या असून त्यांना शिवसेनेची अधिक गरज आहे. निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी मुख्यत: भाजपच्या विरोधात लढली असल्याने ते एकत्र येणे अशक्य आहे. तर, शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायच्या मन:स्थितीत आहे. अशा परिस्थितीत राज्याची सत्ता राखायची तर भाजपच्या नेत्यांना सेनेशी जुळवून घ्यावेच लागणार आहे. हीच संधी साधून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेचा दरारा निर्माण करण्याचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले, ‘शिवसेनेचे प्राधान्य भाजपसोबत जाण्यालाच आहे. प्रश्न चर्चेचा व मागण्या मान्य होण्याचा आहे. सन्मानाने संवाद हा यातला मुख्य मुद्दा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मातोश्रीवरच यायला हवे असे नाही. मात्र, मोदी किंवा शहांच्या पातळीवर काही होत असेल तर शिवसेना नरमाईची भूमिका घेऊ शकते. अर्थात, भाजपला हा प्रश्न सोडवायचा आहे की शिवसेनेला आघाडीकडे ढकलायचे आहे, हाच खरा प्रश्न आहे.’

Protected Content