शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद नाही; श्रीरंग बारणे यांची नाराजी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. हे एनडीए सरकार स्थापन होऊन चोवीस तास ही उलटले नाहीत, तोवर एनडीए गटातील खदखद चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्य मंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवे होते. असे म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक- एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असं होतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना ही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेच भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना ही मंत्री पद द्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी सगळी खदखद बोलून दाखवली. मावळ लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे हे देखील कॅबिनेट मंत्री पदाच्या शर्यतीत होते. ते मावळचे खासदार झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी त्यांचे कॅबिनेटमंत्री म्हणून फलक झळकले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाला केवळ एक मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Protected Content