दीपक केसरकर यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले

सावंतवाडी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्या गटाची पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणारे माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले आहे.

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आज गुवाहाटी येथून पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, “आम्ही पक्षप्रमुखांना अनेकदा सुचविले होते. यात आपण युतीमध्ये राहिलो त्यांच्यासोबत राहूया असे सांगितले होते. मात्र यावर निर्णय झालेला नाही. शिंदे साहेबांच्या संपर्कात आम्ही होतो. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याने आम्ही घटनात्मक दृष्टीने योग्य घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या १६ आमदारांना अपात्र करण्याच्या दिलेल्या नोटीसा बेकायदेशी असून याला आम्ही आव्हान देत असल्याचे ते म्हणाले. यासह आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने आमचा गट हाच शिवसेना असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर लागलीच थोड्या वेळाने सावंतवाडी येथील त्यांचे कार्यालय फोडण्यात आले. शिवसैनिकांच्या जमावाने जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आज दिवसभरात एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला चढविण्यात आला असतांना सायंकाळी उशीरा केसरकर यांच्या कार्यालयावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content