शिरसाड शाळेची परसबाग स्पर्धेत दुहेरी बाजी! तालुका स्तरावर प्रथम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरसाडने शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये आयोजित शालेय परसबाग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच, शाळेने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याचे नाव रोशन केले आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये पोषण आहारासाठी ताज्या भाज्यांचा पुरवठा व्हावा, यासाठी परसबागा विकसित करण्यास प्रोत्साहन दिले जाते. याच उद्देशाने झालेल्या स्पर्धेत शिरसाड शाळेने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

शिरसाड शाळेच्या या नेत्रदीपक यशात शाळेतील वरिष्ठ शिक्षक राजाराम मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, शिवदास महाजन यांनी परसबागेची नियमित आणि उत्कृष्ट देखभाल केली. ग्रामस्थ दगडू तडवी, विश्वनाथ धनगर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनीही शाळेला सक्रिय सहकार्य केले. मुख्याध्यापक रविंद्र शामराव पाटील आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांना योग्य मार्गदर्शन केले, ज्यामुळे हे यश साकार झाले.

स्पर्धेच्या निकालामध्ये शिरसाड शाळेने तालुका स्तरावर अव्वल स्थान पटकावले, तर जिल्हा स्तरावर तिसरा क्रमांक मिळवला. विशेष बाब म्हणजे, या शाळेने परसबाग स्पर्धेत तालुका स्तरावर सन २०२२- २०२३, २०२३- २०२४ आणि आता २०२४- २०२५ असे सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम केला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपशिक्षणाधिकारी सानप, यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, अधीक्षक शालेय पोषण आहार योजना, पंचायत समिती यावलचे सचिन सानप आणि साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेल्या सुंदर परसबागेच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या कृतीशील प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

Protected Content