मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना बॉम्बे हायकोर्टाने ‘गद्दार’ टोमण्याच्या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्यांना अटकपूर्व संरक्षण मंजूर करताना तपास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप शोदरम्यान ‘गद्दार’ असा टोमणा मारल्याच्या आरोपावरून कामरा यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात आज न्यायमूर्ती सरंग कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकृत करत पुढील सुनावणी होईपर्यंत कामरा यांना अटक करण्यात येऊ नये, असे आदेश दिले.
“तपास सुरू राहू शकतो. मात्र, याचिकेचा निकाल लागेपर्यंत याचिकाकर्त्याला अटक केली जाणार नाही,” असे पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार खंडपीठाने स्पष्ट केले. कामरा यांनी आपल्या याचिकेत सांगितले की, ते सध्या तामिळनाडू येथे वास्तव्यास असून, स्टँड-अप शो नंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात येण्यास त्यांना भीती वाटत आहे.