वाघांच्या विरोधात आमदार चौधरींनी थोपटले दंड

अमळनेर प्रतिनिधी । वाघ दाम्पत्यावर आरोपांच्या फैरी झाडत आमदार शिरीष चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

येथील अपक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असले तरी स्थानिक पातळीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि आमदार स्मिताताई वाघ यांच्यासोबतचे त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी यांच्यासह नगरपालिकेचे विरोधी गटनेते बबली पाठक, सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश साळुंखे, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवींद्र चौधरी, आदिवासी ठाकूर समाजाचे राज्य सचिव रणजित शिंदे, सुंदर पट्टी चे सरपंच सुरेश पाटील, नगरसेविका सविता संदांशिव मुस्लिम समाजाचे नेते .माजी सभापती उदय नंदकिशोर पाटील नगरपालिकेचे नगरसेवक माजी नगरसेवक उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार चौधरी यांनी वाघ दाम्पत्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सध्या अमळनेर तालुक्यात घाणेरडे राजकारण सुरू आहे. तालुक्याची विकास कामे होत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांनी विकासकामांमध्ये राजकारण करून श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला होता. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार्य केले परंतु त्यांनी नंतर विश्‍वास घात केला अशा विश्‍वास घात करणार्‍या माणसाला लोकसभेमध्ये जनता-जनार्दन पडल्याशिवाय राहणार नाहीत असे आमदार चौधरी म्हणाले.

हिरा उद्योगसमूहाचे डॉक्टर रवींद्र चौधरी म्हणाले की माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उदय वाघ यांना मदत केली होती. परंतु त्यांनी घाणेरडे राजकारण करून मोठा विश्‍वासघात केला अमळनेर तालुक्यात विकासाची कामे करत असतानाही अंतर्गत राजकारण करीत होते आताही आमदार स्मिता वाघ यांना खासदारकी दिली असली तरी पक्षांतर अंतर्गत मोठ्या कुरबुरी आहेत. एटीनाना सारख्या चांगल्या माणसाचे पक्षाने तिकीट कापलं हीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमदार चौधरी मित्रपरिवार यांना त्रास देणार्‍यांना नेहमीच सोडू नका. मौका सभी को मिलता है असे सांगून चांगलाच समाचार घेतला.

सामाजिक कार्यकर्ते भरत पवार म्हणाले की भाजपचे जिल्हाध्यक्ष करून एक नगरसेवक निवडून येत नाही भाजप त्यांना खासदारकीचे तिकीट कसे देते ? अमळनेर तालुक्याचे आमदारकीसाठी शिरीषदादा चौधरी यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना पुन्हा आमदार करायचा आहे त्यासाठी आपल्याला कामाला लागावे लागेल सांगितले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Add Comment

Protected Content