बिग ब्रेकींग : एकनाथ शिंदे सरकारने जिंकला विश्‍वासमत ठराव !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीमंडळात विश्‍वासदर्शक ठराव सहजपणे जिंकला असून त्यांना विधानसभाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीइतकेच म्हणजे १६४ मते मिळाली. यामुळे आता मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले. यात पहिल्या दिवशी भाजपचे उमेदवार राहूल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात थेट लढत झाली. यात नार्वेकर यांनी १६४ मते मिळवून विजय संपादन केला. तर साळवी यांना १०७ मते मिळाली. यानंतर राहूल नार्वेकर यांनी कालच विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यानंतर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार विश्‍वासदर्शक ठराव देखील सहजपणे आणि जास्त मते घेऊन जिंकणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता. काल रात्री उशीरापर्यंत दोन्ही गटांची संयुक्त बैठक देखील झाली. तर आज सकाळीच आजवर शिवसेनेकडे असणारे आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसमधून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, आज सकाळी ११ वाजता विश्‍वासदर्शक ठरावावर कामकाज सुरू झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात ठराव मांडला. त्यांनी आवाजी मतदानाने ठराव संमत केला. मात्र विरोधकांनी यावर मतदान घेण्याची मागणी केली. यानंतर यावर मतदान सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून मतदानास प्रारंभ केला. यात कालपर्यंत शिवसेनेकडे असलेले संतोष बांगर यांनी ४१व्या क्रमांकाने ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यांनी मतदान करताच शिवसेनेच्या सदस्यांनी ”गद्दार. . .गद्दार” अशा घोषणा केल्या. तर प्रताप सरनाईक यांचे नाव येताच ”ईडी-ईडी” अशा घोषणा देण्यात आल्या. शहाजी पाटील यांच्या मतदानाला झाडी-डोंगर अशा घोषणा झाल्या. सुहास कांदे यांनी १४४वे तर बालाजी कल्याणकर यांनी मॅजिक फिगर मानल्या जाणार्‍या १४५व्या क्रमांकाचे मतदान केले. यात शिंदे सरकारच्या बाजूने एकूण १६४ इतके मतदान झाले. यामुळे सरकारने मोठा अडसर पार केला आहे.

दरम्यान, विश्‍वासमत ठरावाच्या विरोधात ९९ इतक्या आमदारांनी मतदान केले. यामुळे या अतिशय कठीण अशा चाचणीत एकनाथ शिंदे यांचे सरकार उत्तीर्ण झाले आहे. कालच्या प्रमाणेच आजही बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. काल राहूल नार्वेकर विधानसभाध्यक्ष झाल्याने त्यांच्या जागी आज संतोष बांगर यांचे अतिरिक्त मत मिळून देखील आकडा १६४ इतकाच कायम राहिला. तर विरोधकांतर्फे नरहरी झिरवाळ यांचे मत वाढले असले तरी फक्त ९९ मते विरोधात टाकण्यात आली. हा विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाचे दारबंद झाल्यानंतर विधानभवनात पोहोचले. त्यामुळे या आमदारांना बहुमत चाचणीच्या मतदानाला मुकावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप देखील उशीरा पोहोचले. त्यामुळे त्यांनाही मतदान करता आलेलं नाही.

Protected Content