आता बोला… सट्टा पेढी सुरू ठेवण्यासाठी चौकीतच पोलीसाची कॉलर पकडून धमकी

शेंदुर्णीता.जामनेर (प्रतिनिधी ) । ‘मला सट्ट्याचा धंदा का करू देत नाही’ असे म्हणून कारवाईसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून जीवे ठार मारण्याची धमकी देत स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेवून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना शेंदुर्णी येथील आऊटपोस्ट पोलीस चौकीत घडली. समाधान बळीराम पाटील रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी दुरक्षेत्र चौकीवर गस्तीवर असलेले पोहेकॉ प्रशांत पांडूरंग विरणारे (वय-३०) रा. पहूर हे ३१ जुलै रोजी आपल्या दैनंदिन कामे करत होते. दरम्यान, काल सकाळी ८.३० वाजता गावातील संशयित आरोपी समाधान बळीराम पाटील हा पांढऱ्या कॅनमध्ये पेट्रोल भरून घेवून आला. पोलीस चौकीतील दोन खूर्च्या फेकून मारल्या. तसेच सरकारी कागदपत्रे बाजूला फेकून मारली. पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे यांची कॉलर पकडून, “मला सट्ट्याचा धंदा का करू देत नाही” असे म्हणून त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशांत विरणारे यांच्या सोबत असलेल्या कर्मचारी यांना दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि स्वप्निल नाईक करीत आहे. 

Protected Content