मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे संस्थापक खासदार शरद पवार यांचा जळगाव जिल्ह्यातील दौरा हा जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडून पक्षात उभी फूट पडली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीवर ताबा सांगितला असून दुसरीकडे शरद पवार यांनी पक्ष आपलाच असल्याचे ठणकावले आहे. यामुळे अर्थातच दोन्ही गटांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यातच पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यात ठिकठिकाणी जाऊन जनतेचा कौल घेणार असल्याचे जाहीर केले होते.
या अनुषंगाने, शरद पवार हे ९ जुलै रोजी दोन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे निश्चीत झाले होते. ९ रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांची सभा पारोळा येथे तर दुसर्या दिवशी म्हणजे १० जुलै रोजी दुपारी दोन वाजता मुक्ताईनगर तालुका क्रिडा संकुलाच्या मैदानावर तसेच त्या दिवशी सायंकाळी धरणगाव येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या संदर्भात जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आलेली होती. तथापि, शरद पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली असून एबीपी-माझा या वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
हे देखील वाचा : शरद पवार जळगाव जिल्ह्यातून फुंकणार रणशिंग !
जळगाव जिल्ह्यात येत्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने त्यांचा ९ आणि १० जुलै रोजीचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांचा दौरा हा पुढे ढकलण्यात आला असून साधारणपणे आठ दिवसांनी ते जिल्ह्यात सभा घेण्याची शक्यता आहे. यामुळे आता पुढील आठवडच्याच्या शेवटी शरद पवार हे जळगाव जिल्हा दौर्यावर येतील अशी शक्यता आहे.
लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दौरा पुढे ढकलल्याची चर्चा ऐकली असली तरी अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आले नसल्याचे सांगितले.