मतदार याद्यांची तयारी सुरू : पावसाळ्यानंतर होणार निवडणुका !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिल्यामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पावसाळ्यानंतर मुहुर्त लाभण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनानंतर नगरपालिकांचा एक टप्पा वगळता कोणत्याही निवडणुका झाल्या नसून बहुतांश ठिकाणी प्रशासकराज असल्याने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत.

मध्यंतरी उध्दव ठाकरे यांच्या गटाला मिळत असलेला सहानुभूती पाहता निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे मानले जात होते. आता मात्र सरकारमध्ये अजित पवार दाखल झाल्यामुळे समीकरणे बदलली असून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सरकार विचार करण्याची शक्यता आहे. यातच राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या राजपत्रात नागरी आणि ग्रामीण भागातील मतदान याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिले असून यासाठी पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेबर व ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

यामुळे पावसाळा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. तथापि, ९२ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबीत असल्याचा मुद्दा यात अडसर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचाही यात महत्वाचा वाटा राहणार आहे.

Protected Content