मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमींग सुरू असतांनाच शरद पवार यांचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून यामुळे सर्वांचे कुतुहल चाळवले गेले आहे.
काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यानंतर कॉंग्रेसचे अनेक आमदार हे देखील राजीनामा देऊन हाच कित्ता गिरवणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या पाठोपाठ कॉंग्रेसही फुटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता शरद पवार यांचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता बळावल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व राज्यातील कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी काल शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली होती. त्यानंतर आज शरद पवारांनी आपल्या गटाच्या खासदार व आमदारांसह महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात शरद पवार गटातर्फे कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.