जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी शरद पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शरद पवार यांच्यासमवेत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, आशिष भिरूड, अजय काळे, जैन इरिगेशन सिस्टीम चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डा.अनिल ढाके, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी कृषी शिक्षणास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या तंत्रनिकेतनामुळे मोठी सोय झाल्याचे निदर्शनास आणुन दिले.
कविवर्य ना. धों. महानोर यांचे गाव असलेल्या पळसखेडा पासून वाकोदचे अंतर चार किमीचे असुन भवरलाल जैन आणि कवि ना. धों. महानोर यांची मैत्री वाकोद गावातूनच लहानपणापासून वाढीला लागली. त्यांच्या आठवणीही हे तंत्रनिकेतन पाहताना जागृत झाल्या. या आठवणींना शरद पवार साहेबांनी यावेळी उजाळा दिला.
याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाकोदचा वटवृक्ष, वाघूरचे पाणी, मरुभुमीतुन बाहेर पडताना ही भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंची पुस्तके भेट दिली. वाकोदच्या या परिसरात ऍग्रीकल्चर बी.एस्सी. सुरू करावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यासपिठ उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला शरद पवार साहेबांनी यावेळी अशोक जैन यांना केला.
भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे गेल्या १३ वर्षांपासुन हे कृषी तंत्रनिकेतन चालविण्यात येत आहे. वाकोदच्या १०८ एकर परिसरात प्रात्यक्षिसह हे तंत्रनिकेतन विस्तारले आहे. सातत्याने कायम अ श्रेणीत, कृषि क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे कँपस, उच्चविद्याविभुषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व सुविधायुक्त वसतीगृह, सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय, बी.एस्सी. डिग्री पुर्ण करत असताना कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम देखील एकाच प्रक्षेत्रावर असलेली राज्यातील एकमेव संस्था आहे.