कोश्‍यारी-ठाकरे यांच्या पत्रयुद्धात शरद पवारांची उडी

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्‍यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रयुद्धात आता शरद पवार यांनी उडी घेतली आहे. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून “सेक्‍युलर’ संबोधून अवहेलना करणार काय, अशा आशयाचे खरमरीत पत्रं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना पाठविले आहे. त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असलेले भगतसिंग कोश्‍यारी यांची तक्रारदेखील केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्‍युलर ठरवून अवहेलना करणार काय?, असा परखड सवाल पवार यांनी विचारला आहे.

राज्यपाल कोश्‍यारी यांची अशाप्रकारची वागणूक भारतीय राज्यघटनेच्या चौकटीबाहेरची असल्याचे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना मंदिरे का उघडत नाहीत, याबाबत एक पत्र पाठविले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी या पत्राला खरमरीत उत्तर देत पत्रनाट्य रंगविले. या पत्रयुद्धात आतापर्यंत अनेक जणांनी आपापली मते मांडून हा विषय ज्वलंत केला आहे. आता शरद पवार यांच्या पत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

 

Protected Content