अहमदनगर, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार किती अस्वस्थ आहेत याचा प्रत्यय आज अहमदनगरमध्ये आला. नेत्यांबरोबर नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकाराच्या एका प्रश्नावर पवारांचा पारा चढला. चिडलेले पवार पत्रकारावर डाफरलेच, पण पत्रकार परिषदेतून उठून चालू लागले. मात्र, नेत्यांच्या विनवणीनंतर राग गिळून पुन्हा प्रश्नांना सामोरे गेले.
सध्या अनेक आमदार व मोठे नेते वेगवेगळ्या कारणांमुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या तंबूत जात आहेत. वर्षानुवर्षे पवारांना साथ देणाऱ्या दिग्गज नेत्यांचाही यात समावेश आहे. पक्षांतराचे हे लोण अगदी पवारांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. पवारांचे नातेवाईक असलेले उस्मानाबादमधील वजनदार नेते पद्मसिंह पाटील हेही भाजपच्या वाटेवर आहेत. याच अनुषंगाने श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला. या प्रश्नामुळे शरद पवार भडकले. ‘इथे नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठे ?, असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता ?, तुम्ही माफी मागा, असे म्हणत थेट निघून जाऊ लागले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले. त्यानंतर पवार पुन्हा बसले.