अखेर शरद पवार यांच्या जळगावातील सभेची तारीख ठरली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा स्थगित करण्यात आलेला जिल्हा दौरा निश्‍चीत झाला असून यात ते जळगावात भव्य सभा घेणार आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने त्यांचा नाशिक दौरा देखील पार पडला होता. यानंतर ते जळगाव जिल्ह्यात येणार होते. त्यांच्या मुक्ताईनगर, पारोळा आणि धरणगाव या तीन ठिकाणी सभांचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र मध्यंतरी अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.

दरम्यान, आज शरद पवार हे पळासखेडा येथे दिवंगत कविवर्य ना. धो. महानोर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले असतांना त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली. यात आगामी दौर्‍याची तारीख निश्‍चीत झाली. यानंतर आमदार एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यात शरद पवार हे दिनांक ४ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असून त्यांची जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर सभा आयोजीत करण्याची माहिती देण्यात आली. तसेच, या सभेच्या नियोजनाबाबत दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.

आजच्या बैठकीला आमदार एकनाथराव खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई पाटील, महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी , समाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे , जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपुत, महानगर शहर संघटक राजु मोरे , महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपुत, बाजार समिती संचालक डॉ अरुण पाटील, समाजिक न्याय उपाध्यक्ष रमेश बारे, सदिप हिवाळे, सौरभ औचाडे , शुभम म्हस्के, राहुल टोके आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content