मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात विविध वर्गवारीत लघुपट निर्मात्यांना पारितोषिके जिंकण्याची संधी आहे.
मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने ‘योद्धा @ ८० ’ डॉक्युमेंटरी व शॉर्टफिल्म स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त हेमंत टकले यांनी दिली.‘योद्धा @ ८० – अजुनी चालतोचि वाट’ या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म ठरणाऱ्या कलाकृतीस करंडक, प्रमाणपत्र तसेच रोख १,००,०००/- रुपये मिळणार आहेत. द्वितीय पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ७५,०००/- तर तिसरे पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ५०,००० असणार आहे. या पुरस्काराशिवाय पुढील पारितोषिकेही दिली जातील.
विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई (एमएमआरडीए विभाग) विभागातील प्रत्येकी एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक व याव्यतिरिक्त वरील ६ विभागातील महिला दिग्दर्शकांच्या ६ निवडक शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०, ००० रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.
याबाबत माहिती देतांना हेमंत टकले म्हणाले की, १) महिला विकासात शरद पवार यांचे योगदान, २) फुले-शाहू-आंबेडकर : पुरोगामी विचारांचे पाईक शरद पवार, ३) शरद पवार यांचे कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योगदान, ४) महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात पवार यांचे योगदान, ५) कला-साहित्य-संस्कृती : रसिकाग्रणी शरद पवार, ६) क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ : शरद पवार, ७) आपत्कालीन नैसर्गिक प्रसंगातील संकटमोचक : शरद पवार, ८) महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संस्थात्मक उभारणीचे आधारस्तंभ : शरद पवार, ९) लोक माझे सांगाती : शरद पवार, १० ) शरद पवार : एक समग्रदर्शन या विषयांवरील शॉर्ट फिल्म्स या स्पर्धेसाठी स्वीकारण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत जास्तीत जास्त ३ मिनिट कालावधीची शॉर्टफिल्म स्वीकारली जाईल. आपल्या शॉर्टफिल्मच्या प्रवेशिका गुगल ड्राइव्ह लिंकसह सोबत दिलेल्या प्रवेशिका अर्जासोबत [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या दोन्ही वेबसाइटवर डाऊनलोड उपलब्ध असतील. स्पर्धकांना १२ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबर २०२० पर्यंत शॉर्टफिल्म पाठवता येतील. स्पर्धेसाठी वयाची मर्यादा नाही. तसेच या कुठलेही शुल्क नसणार आहे.