काश्मीरात जोरदार धुमश्‍चक्री : चार दहशतवादी ठार

जम्मू वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरातल्या नगरोटा येथील बान या टोल नाक्याजवळ आज पहाटे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली असून यात चार अतिरेकी ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना जोरदा हादरा दिला आहे. बन टोल प्लाझाजवळून घुसखोरीचा प्रयत्न करणारे चार दहशतवादी ठार झाले आहेत. हे चारही अतिरेकी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. या चकमकीत दोन एसओजी जवानही जखमी झाले आहेत.

आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बन टोला प्लाझा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमकीला प्रारंभ झाला. पोलिसांनी सोपोरकडे तपासणीसाठी जाणार्‍या एका ट्रकला थांबवले असता ट्रकमागे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी घाबरून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिस एसओजी टीम, सैन्यदलाचे जवान व सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले असून यात चार दहशतवादी ठार झाले आहेत.

चकमकीच्या पहिल्या सव्वा तासाच्या आत सुरक्षा दलाने ट्रकमधील तीन दहशतवाद्यांना ठार मारले. ट्रकमध्ये एक दहशतवादी अजूनही होता जो सुरक्षा दलावर मधूनमधून गोळीबार करीत होता. सुरक्षा दलाने त्याला शरण जाण्यास सांगितले पण तो बाहेर आला नाही. त्यानंतर सुरक्षा दलाने स्फोटकांचा वापर करून संपूर्ण ट्रक उडवून दिला. यात चौथा दहशतवादीही ठार झाला. या चकमकीनंतर परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

Protected Content