शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएम मशीनला घातला हार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदानापूर्वी पहाटे त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात पूजा विधी करत अभिषेक केला. मंदिरात दर्शन झाल्यानंतर सात वाजता त्यांनी त्र्यंबकेश्वरातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर स्वामी शांतीगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला आपल्या गळयातील हार घातला.त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याने मतदान केंद्रावर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटप केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शांतिगिरी महाराज यांच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

शांतिगिरी महाराज म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरांने मला आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. भाजपसह सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांचा आपल्याला पाठिंबा आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाची निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. मतदार आम्हाला भरभरुन मतदान करतील, असे महाराज म्हणाले. ईव्हीएमला हार का घातला, असा प्रश्न महाराजांना विचारण्यात आला. त्यावर मतदान पवित्र आहे. या यंत्राजवळ मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना सद्बुद्धी व्हावी. त्यांचे मत भारतमातेच्या कामी यावे म्हणून ईव्हीएमला हार घातल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content