जळगाव प्रतिनिधी । महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज हे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे जळगाव लोकसभेच्या रिंगणात उतारणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून त्यांची अकस्मात एंट्री या मतदारसंघातील निकालावर निश्चितच परिणाम करणारी ठरू शकते.
उघड राजकीय आकांक्षा
वेरूळ येथील जनार्दन महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांची राजकीय महत्वाकांक्षा कुणापासून लपून राहिलेली नाही. २००९च्या लोकसभा निवडणुकीत ते औरंगाबादमधून अपक्ष म्हणून उभे राहिले. यात त्यांचा पराभव झाला तरी त्यांना मिळालेली तब्बल १.४८ लाख मते अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली होती. यानंतर त्यांनी म्हणजे २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा सरळ फटका युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना बसेल हे निश्चित होते. यामुळे युतीच्या नेत्यांनी मनधरणी करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास लावले होते. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. मध्यंतरी युतीतील तणावाच्या वातावरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शांतिगिरी महाराजांची अनौपचारीकपणे गुप्त भेट घेतल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळाच रंगली होती. अर्थात, युती न झाल्यास भाजपतर्फे त्यांना संधी मिळण्याची शक्यता होती. तथापि, आता युती होण्याचे संकेत मिळताच शांतिगिरी महाराज यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळण्याचे संकेत दिले आहेत.
हा योगायोग नाहीच !
महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांचा बाबाजी भक्त परिवार हा औरंगाबादसह जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर आदी जिल्ह्यांमध्ये आहे. विशेष करून घाटाच्या वर आणि खाली म्हणजे औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात त्यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. यामुळे शांतिगिरी महाराजांनी जर औरंगाबाद जमत नसेल तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी त्यांना गळ घातली. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये याबाबत भक्त परिवारातर्फे चाचपणीदेखील करण्यात आली. यातच राजकारणाच्या शुध्दीकरणाचा नारा बुलंद करत शांतिगिरी महाराजांनी राजकारणातील अधिकृत प्रवेशाची घोषणादेखील जळगावमधूनच करावी हा काही निव्वळ योगायोग नाही. वास्तविक पाहता, शांतिगिरी महाराज हे जळगावमधील निर्धार सभेत थोडे हातचे राखून बोलले. मात्र त्यांच्या भक्त परिवारातील काहींशी वार्तालाप केला असता, सर्वांना कामाला लागा असे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अर्थात बाबाजी स्वत: अथवा आपल्या एखाद्या समर्थकाला जळगाव लोकसभा मतदारसंघातून आखाड्यात उतारू शकतात. रावेर मतदारसंघाबाबत मात्र अद्याप सन्पेन्स ठेवण्यात आला आहे.
समीकरण बदलणार
बाबाजी भक्त परिवारातील कुणाही सदस्याची जळगाव लोकसभा मतदारसंघातील एंट्री हे विद्यमान राजकीय स्थितीत थोडा तरी बदल करू शकतात. हा उमेदवार हिंदुत्ववादी विचारधारेची म्हणजे फक्त भाजपचीच मते घेईल असे म्हणजे धाडसीपणाचे व एकांगी ठरू शकते. असे सरसकट विश्लेषण कुणीही करू शकणार नाही. मात्र देशभरात सध्या निधर्मी मतांच्या भाजपविरोधात होणार्या धु्रविकरणाला जळगावात जर बाबाजी परिवाराच्या उमेदवारीची जोड मिळाली तर भाजपच्या उमेदवारासाठी अवघडलेली स्थिती निर्माण होऊ शकते. शांतिगिरी महाराजांना राजकारणाच्या शुध्दीकरणाचा मांडलेला मुद्दा हा सुशिक्षीत मतदारांना भावण्याची शक्यता आहे. त्यांचा उमेदवार भलेही जिंकण्याची शक्यता कमी असली तरी ते नेमकी किती आणि कुणाची मते खाणार? यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. अर्थात, बाबाजींचा राजकीय शंखनाद हा प्रस्थापितांना धडकी भरवणारा ठरणार हे निश्चीत. मात्र यातून कुणाचा घात होणार हे तर आगामी काळच ठरवणार आहे.
Babajincha prachar jorat karu ya aani bjp kadun ladha