लक्ष्मी माता कृषी विज्ञान मंडळाने पोकरा योजनेतून साकारली अवजार बँक

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील काही गावामध्ये लक्ष्मी माता कृषी विज्ञान मंडळातर्फे पोकरा योजनेतून अवजार बँक साकारण्यात आली आहे.                                               

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. आपल्या स्वतःच्या गटाची तसेच गावाकरिता अवजार बँक योजनेतून लागणाऱ्या ट्रॅक्टर आणि शेतीच्या मधागतीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून आधुनिक शेती करावी. आपले उत्पन्न वाढवून आत्मनिर्भर व्हावे. असे आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी केले आहे.

पारोळा येथे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजना सन २०२०-२१ अंतर्गत भाडेतत्त्वावर अवजार बँक व त्याकरिता लागणारे शेड बांधकाम या करिता मौजे शेवगे बू. तालुका पारोळा येथील लक्ष्मी माता कृषी विज्ञान मंडळास उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर यांच्यामार्फत पूर्व संमती देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत गटाने मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून ट्रॅक्टर, रोटावेटर, थ्रेशर,बीबीएफ यंत्र, पलटी नांगर, टिलर या अवजारांची खरेदी केली असून अवजारे ठेवण्याकरिता शेडचे बांधकाम देखील पूर्ण केलेले आहे.

सदरील योजनेतून प्रकल्प खर्चाच्या एकूण 60 टक्के अनुदान मिळणार असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. आज पोकरा योजने अंतर्गत लक्ष्मी माता कृषी विज्ञान मंडळ, शेवगे बु. ता.पारोळा या गटाला मिळालेल्या ट्रकटर व इतर औजारांची पाहणी करून व फित कापून खासदार उन्मेष  पाटील यांनी उदघाटन केले. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार ,विवेक पाटील उपस्थित होते.

 

 

 

Protected Content