Home प्रशासन नगरपालिका वरणगाव नगराध्यक्षांकडून शैलजा नारखेडेंचा सत्कार

वरणगाव नगराध्यक्षांकडून शैलजा नारखेडेंचा सत्कार

0
7


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज भुसावळ नगरपरिषदेत दाखल होत प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांची भेट घेतली. यावेळी श्रीरामाची शाल पांघरून शैलजा नारखेडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भुसावळ शहरातील विविध नागरी समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांची टीम एमएच १९ सीडब्ल्यू ०९०९ क्रमांकाच्या वाहनाने दुपारी सुमारे तीन वाजता भुसावळ नगरपरिषदेत पोहोचली. नगराध्यक्ष काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी श्रीरामाची शाल पांघरून त्यांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ-वरणगाव रोडची सध्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, रिक्षाचालक तसेच प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नगराध्यक्ष काळे यांनी निदर्शनास आणून दिले. खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यताही वाढली असून, संबंधित यंत्रणेने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रस्त्याच्या दुभाजकात तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली काटेरी झुडपे तातडीने काढण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. वाढलेल्या झुडपांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होण्यासोबतच वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिवाजीनगर ते पंधरा बंगला या परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. भुसावळच्या जुन्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. शहरातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जुन्या बसस्थानकाची अवस्था लक्षात घेता त्याचे नूतनीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यासोबतच भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीला चालना देण्यासाठी नगरपरिषदेत ठराव मंजूर करावा, अशी मागणीही नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याशी चर्चेदरम्यान केली. भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या भेटीप्रसंगी नगरसेवक किरण कोलते, सतीश सपकाळे, बबलू बर्हाटे, वरणगावचे जनसेवक मिलिंद भैसे, शेतकी संघाचे संचालक प्रकाश चौधरी, नगरसेवक नाना चौधरी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, जनसेवक आकाश निमकर, फझल शेख, कुंदन माळी, भोजराज पालवे, ज्येष्ठ नेते बळीरामदादा सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound