मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांच्या स्वागतासाठी लावलेल्या गाण्यावरून भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या संदर्भातील वृत्त असे की, काल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. यातील अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यातच आता या अधिवेशनात लावण्यात आलेल्या एका गाण्यावरून भारतीय जनता पक्षाने टिकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांच्या एंट्रीला कार्यकर्त्यांनी ‘जोधा अकबर’ या चित्रपटातील ‘अज़ीम-ओ-शान शहंशाह’ हे गाणं लावलं. त्यावरुन ट्वीट करत भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पवार साहेबांची दिल्लीतील ‘शहंशाह’ हीच खरी ओळख आहे, अशा शब्दात भाजपच्या ट्विटरवरुन निशाणा साधण्यात आला आहे. तसेच, ”राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे ?” असा प्रश्न देखील या ट्विटमध्ये विचारण्यात आलेला आहे. दरम्यान, भाजपने ट्विट केल्यानंतर दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत.
‘शहंशाह’ हीच पवार साहेबांची खरी ओळख ! : भाजपचा हल्लाबोल
3 years ago
No Comments