ध्येय ठरवा आणि त्यासाठी झटत राहा — अभिनेत्री श्रेया बुगडे  


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित एकविसावा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते झाले. “विद्यार्थ्यांनी स्त्री-पुरुष या भेदातून बाहेर पडून आपल्या ध्येयासाठी झटावे आणि माणूस म्हणून अव्वल ठरावे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

श्रेया बुगडे म्हणाल्या की, “युवा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. या मंचातून मिळालेल्या अनुभवाचे सोनं करा. आई-वडिलांचा अभिमान वाटेल असे आयुष्य जगण्यासाठी आपले ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.” त्यांनी उपस्थितांना प्रेरणा देत म्हटले की, “आजच्या डिजिटल युगात संधी अमर्याद आहेत, पण ज्या क्षेत्रात काम कराल त्यात उत्कृष्टता साधा.” त्यांनी स्वतःची चारोळी सादर करून, तसेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सई ताम्हणकर यांची मिमिक्री सादर करत वातावरण रंगवले.

या वेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कारभारी काळे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, तसेच अनेक प्राध्यापक आणि मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “वंदे मातरम् हे केवळ गीत नसून राष्ट्राच्या ऐक्याचे प्रतीक आहे. इंद्रधनुष्य हा उत्सव नसून तो कला, ऊर्जा आणि सर्जनशीलतेचा संगम आहे. विद्यार्थ्यांनी या मंचाचा उपयोग आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी करावा.”

युवक महोत्सवाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम् @१५०’ या थीमवर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते प्रशासकीय इमारतींपर्यंत काढलेल्या या मिरवणुकीत सहभागी विद्यापीठांच्या संघांनी महाराष्ट्राच्या विविध संस्कृती, परंपरा आणि लोककला यांचे दर्शन घडवले. ढोल-ताशा, लेझीम, नारीशक्ती, वारकरी संस्कृती, कोकणातील दशावतार, छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा अशा विविध विषयांवर कलावंतांनी सादरीकरण केले.

युवा महोत्सवात राज्यातील २४ विद्यापीठांचे सुमारे हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पुढील काही दिवसांत भारतीय समूहगान, पाश्चिमात्य संगीत, एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, मातीकला, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा होणार आहेत.

महोत्सवात विद्यापीठाचे माजी कार्याध्यक्ष दिलीप पाटील, प्रा. ए.एम. महाजन, दीपक पाटील, राजेंद्र नन्नवरे व नितीन झाल्टे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. योगेश महाले, डॉ. रफिक शेख व खेमराज पाटील यांनी केले, तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले.

या भव्य उद्घाटन सोहळ्याला विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षक, विविध समित्यांचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक महोत्सवाच्या माध्यमातून नव्या उर्जेचा, सर्जनशीलतेचा आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव साजरा झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.