
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय रुग्णालयातील डॉक्टरांनी जुनागढ येथे गिरनार परिक्रमेच्या निमित्ताने दाखवलेली सेवा भावना सर्वांच्या मनाला स्पर्शून गेली आहे. सततच्या पावसामुळे गिरनार परिक्रमा रद्द झाली असली तरी या डॉक्टरांनी आपला वेळ दत्तभक्तांच्या आरोग्य सेवेसाठी अर्पण करून खऱ्या अर्थाने ‘सेवा परिक्रमा’ पूर्ण केली.
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे बालरोग विभागप्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, नेत्र विभागाच्या डॉ. नितु पाटील, रेल्वे बाह्य रुग्ण विभाग भुसावळचे फार्मासिस्ट विवेक पाटील आणि सहकारी दीपक फेगडे हे गिरनार परिक्रमेच्या निमित्ताने जुनागढ येथे गेले होते. मात्र सततच्या पावसामुळे परिक्रमा रद्द झाल्याने त्यांच्याकडे जवळपास २४ तासांचा मोकळा वेळ होता. हा वेळ व्यर्थ घालवण्याऐवजी त्यांनी तो भवनाथ तलेठी नाकोडा येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवेसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.
या सेवाकार्यात त्यांनी संपूर्ण दिवसभर येणाऱ्या दत्तभक्तांची तपासणी केली, औषधोपचार दिले आणि आवश्यक सल्ला पुरवला. महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूंना जेव्हा आपल्याच राज्यातील डॉक्टर त्यांच्या सेवेसाठी पुढे सरसावलेले दिसले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते. भाषेचा अडथळा नव्हता, तर एक आत्मीय नातं निर्माण झालं होतं.
या उपक्रमात स्थानिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयदीप वाला, डॉ. हार्दिक पटेल, फार्मासिस्ट मयूर सिसोदिया आणि सहकारी बिपिन ढाकेचा यांनी सक्रीय मदत केली. स्थानिक प्रशासनानेही या स्वयंसेवी आरोग्य सेवेचे कौतुक केले.
डॉ. नितु पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आमची ही पहिली गिरनार परिक्रमा होती. गुरूशिखर दर्शन झाले पण पावसामुळे परिक्रमा रद्द झाली, याची खंत होती. मात्र भगवान दत्तभक्तांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. हीच आमची ‘रुग्णसेवा परिक्रमा’ भगवान दत्त महाराजांच्या चरणी अर्पण आहे.”
या सेवाकार्यातून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजने केवळ वैद्यकीय क्षेत्रातील नव्हे तर मानवतेच्या क्षेत्रातील आपले योगदान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. परिक्रमा रद्द झाली, पण या सेवेमुळे “मानवतेची परिक्रमा” पूर्णत्वास गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.



