ट्रक व ट्रॅव्हल्सची समोरा-समोर धडक : दोन गंभीर जखमी

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ट्रकने खासगी ट्रॅव्हल्स बसला दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, सावदा येथील श्री साईबाबा मंदिराच्या जवळ सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात एमएच ०७ एचबी ४९४४ या क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने जळगावकडे जाणार्‍या एमएच१६ क्यू ९९८६ या क्रमांच्या खासगी आराम बसला ( लक्झरी ट्रॅव्हल्स) जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, लक्झरीच्या चालकासह एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात लक्झरीतील अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. तर, गंभीर जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर रस्त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली असून याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी अलीकडेच पत्रकारांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रसंगी तात्काळ रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले होते. तथापि, अद्यापही रस्त्याची दुरूस्ती सुरू करण्यात न आल्यामुळे अनेक अपघात होत असून आजचा अपघात देखील याच प्रकारातील असल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content