आमचे बरेवाईट झाल्यास कैलास सोनवणे जबाबदार- गायकवाड कुटुंबीय ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपतीनगर भागातील गायकवाड परिवार राहात असलेले घर पाडण्याचा प्रयत्न काल महापालिका प्रशासनाने केल्यानंतर आज पिडीत परिवाराने पत्रकार परिषद घेऊन महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्या घरासाठी उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्याचवेळी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करून आपले काही बरे-वाईट झाल्यास त्या गोष्टीला सर्वस्वी नगरसेवक कैलास सोनवणे जबाबदार असतील, असा आरोपही त्यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत गायकवाड कुटुंबीयांनी म्हटले की, संबंधीत घराचा व्यवहार खोटा असून कैलास सोनावणे यांनी आमचे घर बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे. आमच्या वडिलांच्या भोळसटपणाचा गैरफायदा घेतला आहे. रोखीने पैसे दिल्याचे खोटे बोलत आहेत. आम्ही वडिलांना इकडे बोलावून समक्ष सगळे खरे-खोटे करणार आहोत. कैलास सोनवणे सत्तेचा गैरवापर करीत आहेत. महापालिका अधिकारी व पोलीसही त्यांना सामील आहेत. मनपाचे अधिकारी खान आणि पाटील कारवाई करण्यापूर्वी आमच्याकडे आले असता कारवाई न करता आमच्या बाजूने बचाव करण्यासाठी पाच लाखांची मागणी करीत होते. रामानंद नगर पो.स्टे. चे पोलीस तक्रार लिहून घेताना पेन्सिलीने लिहितात आणि कारवाई करीत नाहीत. माझ्या मुलाने पगार उचल घेऊन वकिलाची ६० हजार फी दिली आहे. आता पगार न घेता काम करतोय, आम्ही अत्यंत हलाखीत दिवस काढतोय. वकील म्हणतात की, तुम्ही कॅव्हेट दाखल केले तर घर पाडता येत नाही, तरी पण मनपा अधिकारी कशी काय कारवाई करीत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपल्या हक्कासाठी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देतानाच आम्ही मेलो तरी घर सोनवणेंना मिळू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला. आपल्या घरात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला गायकवाड कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित होते.

पहा : नेमके काय म्हणाले गायकवाड कुटुंब !

Add Comment

Protected Content