मुंबई प्रतिनिधी । ९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे उर्फ काकडे काकांचे आज दुपारी मुंबईतील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले.
ते ८९ वर्षांचे होते. अरुण काकडे यांच्या निधनामुळे सुमारे सात दशके प्रायोगिक रंगभूमीची अव्याहत सेवा करणारा मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. ‘आविष्कार’ नाट्यसंस्था ज्याच्या खांद्यावर संस्था उभी राहिली असा मजबूत खांब म्हणून अरुण काकडे उर्फ काकडे काका परिचित होते. गेली ६७ वर्षे त्यांनी प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून ठेवलं आणि उतारवयातही त्यांनी तरुणांना लाजवील अशा उत्साहाने नवीन नाटकं सादर केली. त्यांच्या या एकूण योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला होता. विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांच्यासह त्यांनी रंगभूमीची सेवा केली. प्रयोगशील ही ओळख त्यांनी आयुष्यभर जपली.