उठसुठ सेल्फी घेणार्यांसाठी एक खुशखबर आहे. आता वेगवेगळ्या बॅकग्राऊंडसह नाविन्यपूर्ण सेल्फीज घेण्यासाठी चक्क सेल्फी फॅक्टरी उघडण्यात आलेली आहे. याबाबत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट.
लंडन शहरातील मध्यवर्ती भागामध्ये सेल्फी फॅक्टरी या नावाने एक वैशिष्ट्यपूर्ण शॉप उघडण्यात आलेले आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात सेल्फी प्रतिमा घेण्यासाठी विविध लोकेशन्स दिलेले आहेत. यात अगदी स्टुडीओत विविध ठिकाणांना आभासी पध्दतीत साकारण्यात आलेले आहे. यात बाथ टब पासून ते निसर्गरम्य ठिकाणांचाही समावेश आहे. यात काळानुसार लोकेशन्स तयार केलेले आहेत. यामुळे कुणी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या कालखंडानुसार सेल्फी प्रतिमा घेऊ शकतो.
सेल्फी फॅक्टरीमध्ये क्रोमा इफेक्ट असणारा स्टुडिओदेखील आहे. यामुळे मागील भाग बदलून हवा तसा बदल करण्याची सुविधा युजरला प्रदान करण्यात आलेली आहे. अर्थात, कुणीही हव्या त्या प्रकारे सेल्फी काढण्यासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. खरं तर सेल्फीच नव्हे तर कुणी येथे नियमित फोटोग्राफ्सदेखील घेऊ शकतो. हे ठिकाण सेल्फीप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी अतिशय उपयुक्त आहे. एक तासासाठी येथे ९.९९ युरो तर दिवसासाठी १९.९९ युरो इतकी आकारणी यासाठी करण्यात येते.
जगभरात सेल्फी घेऊन याला सोशल मीडियात शेअर करण्याची क्रेझ आहे. विशेष करून इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर तर प्रत्येक क्षणाला लक्षावधी सेल्फी शेअर होत असतात. या पार्श्वभूमिवर, नाविन्यपूर्ण सेल्फी घेण्यासाठी सेल्फी फॅक्टरी अतिशय उपयुक्त असल्याचे या स्टोअरच्या संचालकांचे मत आहे.
पहा : सेल्फी फॅक्टरीची माहिती देणारा व्हिडीओ.