स्व. तात्यासाहेब : सर्वस्पर्शी कर्तृत्व अन दूरदर्शी नेतृत्व असलेला लोकनेता

 

r o patil 1553755501

 

 

चैतन्याच्या वरप्राप्तीमुळे काही शाश्वत फुले सर्वांनाच सुगंध देत राहतात. जिल्ह्याचे कृषी सम्राट म्हणजेच तात्यासाहेब आर. ओ. पाटील हे नाव त्या सुगंधी फुलासारखेच आहे. तात्यासाहेबांनी भारतीय शेतीला समृद्धीचा मंत्र दिला. गेली ४० वर्षे सर्वदूर निर्मल बीज पेरून अखंड धरती मातेची सेवा केली. उद्योगाचा कोणताही वारसा पाठीशी नसताना ते पहिले यशस्वी उद्योजक झाले. महाराष्ट्रातल्या उद्योग जगतात एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षितिजावर पाऊल ठेवत त्यांनी यशाचे शिखर काबीज केली. पाचोर्याचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन कृषी क्षेत्रात लौकिक मिळवला. त्यांनी केलेली नेत्रदीपक प्रगतीची यशोगाथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही. वक्तृत्वावर प्रभावी हुकूमत हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे, तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचे विचार मौलिक आहेत. ज्या घरात जन्माला आलो त्या घराला मोठे करण्यामध्ये सर्वजण आपला आयुष्य खर्ची घालतात परंतु मी ज्या गावातून आलो त्या गावाला कोण मोठे करणार, ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांचे जीवनमान कोण सुधारणार केवळ याच एका उदात्त हेतूने तात्यासाहेबांनी पाचोरासारख्या लहान शहरात शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी धाडसी पाऊल टाकले आणि त्यातूनच आज जगभर नावारूपास आलेला निर्मल उद्योग समूह उभा राहिला.

तात्यासाहेबांनी जोपासलेली उद्योजकता केवळ आर्थिक विकासासाठी नाही तर भावी पिढीला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे, त्याचबरोबर दर्जेदार बियाणे उद्योग क्षेत्रात भारत सवय पूर्ण व सक्षम बनला पाहिजे, या अभिनव विचारातून धाडसी पाऊल टाकले. जगातले अतिप्रगत तंत्रज्ञान आपल्या मातीत रुजावे यासाठी त्यांची तळमळ होती. त्यामुळेच तात्यासाहेबांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. कृषी क्षेत्रात विविध पदावर यांची निवड करण्यात आली होती. त्यांची खरी ओळख कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी, आधुनिक शिक्षणाचे प्रणेते, पुरोगामी दृष्टिकोन असलेले अन सामाजिक तळमळ असलेले लोकनेते अशी आहे.
आधुनिक शिक्षणाचे प्रणेते तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांनी खऱ्या अर्थाने पाचोरा येथे दर्जेदार व आधुनिक शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी सर्वप्रथम सी.बी.एस.ई. वर आधारित शाळा काढून पूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. पुणे मुंबई नागपूर सारख्या मेट्रोपॉलिटन शहरातील शाळेला शोभेल अशी प्रशस्त व टोलेजंग शाळा त्यांनी उभी केली. शाळा सुरु करतानाच ते म्हणाले होते की, प्रगतीची बिजे शाळेत पेरली जातात, त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होतो, माझ्या शाळेतून उद्याचे नामवंत डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, नामवंत लेखक, साहित्यिक निर्माण व्हावे, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच त्यांच्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल आणि विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयात आज सर्व सोयीं सुविधा युक्त आधुनिक दर्जाचे शिक्षण दिले जात आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची जडणघडण होत आहे. येथे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र उभारणीच्या क्षमता निर्माण करण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रम राबवले जातात, दरवर्षी शिक्षकाचे उद्बोधन केले जाते, नवीन शैक्षणिक पद्धत स्विकारली जाते. उत्तम अध्यापनाची गुणवैशिष्ट्ये असणारी शिक्षक मंडळी येथे आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची परंपरा शाळेच्या निकालातून दिसून येते.

राजकीय आणि उद्योग विश्वात कोणताही गॉडफादर नसताना कर्तुत्वाचा हिमालय उभा करून त्यांनी स्वतःचे मोठेपण सिद्ध केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासकीय पातळीवर विकासात दीर्घकालीन योजना राबवल्या जाव्यात, त्यासाठी लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित, सुसंस्कृत अभ्यासू व लोकांच्या समस्या पोटतिडकीने मांडणारा असावा ही त्यांची धारणा होती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या समाजसेवेसाठी राजकारणात प्रवेश केला. तात्यासाहेबांचा जीवनपट बघीतला तर त्यांनी समाजकारणालाच प्रथम स्थान दिले आहे. समाजकार्यासाठी ते झटत असताना त्यांनी कधीच विराम घेतला नाही. स्वच्छ प्रतिमा नि:स्वार्थी सेवाभाव व काम करण्याची जिद्द म्हणूनच त्यांना पाचोरा मतदार संघाच्या इतिहासात सलग दोनदा विक्रमी मतांनी विजयी होण्याचा मान मिळाला. अभ्यासू व प्रगल्भ नेता अन संयमी वक्ता म्हणून त्यांची राजकीय पटलावर प्रतिमा तयार झाली होती. नवीन नेतृत्वाला संधी म्हणून त्यांनी विद्यमान आमदार किशोर पाटील यांना पुढे आणून त्यांचे नेतृत्व घडवले.

जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात अभ्यास केला तर आपल्याला तात्यांचे नेतृत्व संयमी, दूरदर्शी व विचारपूर्वक कृती करणारे सर्वस्पर्शी होते. शेतीशी निगडित असलेल्या ८०%टक्‍के लोकांशी त्यांचा थेट संवाद होता. आज कुठे त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अशक्य आणि नकारात्मकता या दोन गोष्टींना त्यांच्या जीवनात अजिबात स्थान नव्हते. ते जिल्ह्याचे नेतृत्व सक्षम पणे करू शकत होते. त्यांच्या कर्तुत्वाला सामाजिक भान होते आणि सामाजिक कार्यांना त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा आधार होता. त्यांचे कर्तृत्व सार्वजनिक जीवनात येणाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करणारे होते, यात कुणाचे दुमत असू शकत नाही.

लेखक – गणॆश शिंदे, पाचोरा.

Add Comment

Protected Content