Home Cities जळगाव भासवाल येथे सीरत-उन-नबी संमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात 

भासवाल येथे सीरत-उन-नबी संमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात 

0
6


जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्याच्या युगात संपूर्ण मानवजात नैतिक संकट, द्वेष आणि विविध सामाजिक समस्यांना तोंड देत असताना, प्रेषित मुहम्मद (स.) यांची जीवनशैली, करुणा आणि शिकवण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे, असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामी हिंद जळगावचे अध्यक्ष प्रा. सोहेल अमीर शेख यांनी केले. भासवाल येथे जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे आयोजित ‘सीरत-उन-नबी (स.)’ या भव्य जाहीर संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या संमेलनात ८५० हून अधिक महिला, पुरुष, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मौलाना शब्बीर यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली. त्यानंतर अखलाक भाई भासवाल यांनी प्रास्ताविक भाषणात संमेलनाचा मुख्य उद्देश स्पष्ट करत आजच्या काळात प्रेषितांची शिकवणी सर्वदूर पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली. या संमेलनात विविध विचारवंत व वक्त्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. ‘सीरत-ए-नबी आणि महिला’ या विषयावर साजिदा परवीन यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी प्रेषितांच्या शिकवणीनुसार आदर्श कुटुंब व समाज घडवण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

युवकांसाठी आयोजित विशेष सत्रात मुफ्ती मुहम्मद यांनी तरुणांनी प्रेषितांचे नीतिमत्ता, चारित्र्य आणि संघर्षाचे गुण अंगीकारून समाजात सकारात्मक बदलावाचे माध्यम बनावे, असे स्पष्ट केले. मौलाना हाफिज मजीद यांनी प्रेषितांची नम्रता, साधेपणा आणि सौम्यतेच्या प्रसंगांचे वर्णन केले. या प्रसंगी आसिम यांनी सादर केलेल्या ‘नात-ए-रसूल’ने उपस्थितांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात प्रा. सोहेल अमीर शेख यांनी प्रेषितांचे जीवन ही केवळ ऐतिहासिक घटना नसून ती एक संपूर्ण जीवनसंहिता आहे, असे सांगत सर्वांनी संयम, आशा आणि दृढनिश्चयाने मानवतेच्या सेवेसाठी कार्यरत राहावे, असा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ३० ऑगस्ट रोजी विविध शाळांमध्ये घेण्यात आलेल्या ‘सीरत प्रश्नमंजुषा स्पर्धे’तील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या पाल्यांचे कौतुक पाहून उपस्थित पालकांनी आनंद व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थनेने झाली. या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्वान, वक्ते, मान्यवर पाहुणे, विद्यार्थी व पालकांचे आयोजकांनी आभार मानले.


Protected Content

Play sound