रांची वृत्तसंस्था । झारखंडमधील दुसर्या टप्प्याच्या मतदानास आज सकाळपासून प्रारंभ झाला असून यात २० जागांसाठी मतदान होत आहे.
झारखंड विधानसभेसाठी दुसर्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली. या टप्प्यात २० जागांवर मतदान होत असून यासाठी २६० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. दुसर्या टप्प्यातील २० पैकी १६ मतदारसंघ आरक्षित आहेत. यात बहरागोड़ा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपुर पूर्व, जमशेदपुर पश्चिम, सरायकेला, चाईबासा, मंझगांव, जगन्नाथपुर, मनोहरपुर, चक्रधरपुर, खरसावां, तमाड़, तोरपा, खूंटी, मांडर, सिसई, सिमडेगा आणि कोलेबिरा या मतदारसंघात मतदान होत आहे. याच टप्प्यात मातब्बरांची कसोटी होत असून यामध्ये मुख्यमंत्री रघुवर दास, विधानसभा अध्यक्ष दिनेश उराव आणि भाजपा अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांसारखे नेते मैदानात असून बर्याच ठिकाणी चुरशीच्या लढतीची शक्यता आहे.