…तर काँग्रेस पक्ष पुढील ५० वर्षे विरोधातच बसेल ! – आझाद यांचा इशारा

नवी दिल्ली । काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ इच्छीणार्‍यांना एक टक्के देखील पाठींबा नसल्याचे स्पष्ट करत पक्षांतर्गत निवडणुका न झाल्यास पक्ष पुढील ५० वर्षे विरोधातच बसेल असा इशारा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या नेत्यांविषयी काँग्रेसमध्ये विरोधाची भावना निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली असून, सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्‍या नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलखतीत पुन्हा एकदा बाँब टाकला आहे.

या मुलाखतीत आझाद यांनी पत्र लिहिलेल्या नेत्यांविरूद्ध बोलणार्‍यांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, ज्या कोणी व्यक्ती आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहेत तो केवळ आपलं पद जाऊ नये यासाठी करत आहेत. जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल. अन्यथा पुढील ५० वर्षेदेखील काँग्रेस विरोधकांच्याच भूमिकेत दिसेल असा इशारा त्यांनी दिला.

आझाद पुढे म्हणाले की, तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मतं तुमच्या बाजूनं असतात आणि पक्षात केवळ तुम्ही २ ते ३ लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मतं मिळणार्‍या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जे पदाधिकारी वा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आमच्या प्रस्तावाचा विरोध करत आहेत, त्यांना माहितीये की निवडणुका झाल्यास ते कुठेच दिसणार नाही. जे कुणी काँग्रेसच्या हिताचा विचार करत आहेत, ते आमच्या पत्राचं स्वागतच करतील, असं आझाद यांनी नमूद केलं.

काँग्रेस अध्यक्षपदी पूर्णवेळ व कार्यक्षम व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशी मागणी करत पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यसमितीच बैठक पार पडली. या बैठकीतही गोंधळ झाला होता. कालच कपिल सिब्बल यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत दिले होते. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी सुध्दा याच प्रकारचा पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

Protected Content