विशाखापट्टणम वृत्तसंस्था । भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला दुसरा वन-डे सामना आज विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात येणार आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून विंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतलं आव्हान जिवंत राखण्यासाठी भारतीय संघासाठी विशाखापट्टणममध्ये विजयाची नितांत गरज आहे.
पहिल्या सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि होपच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकला. आज मालिकेतसा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारताला मालिकेतील आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात पराभवसाठी भारताची सुमार गोलंदाजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. पहिल्या सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि शाय होपने द्विशतकी भागीदारी करत टीम इंडियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने दिलेले 289 धावांचे आव्हान विंडीजने 13 चेंडू आणि आठ विकेट्स राखून पार केल होते. हेटमायरनं 11 चौकार आणि 7 षटकारांसह 139 धावा कुटल्या. होपनेही नाबाद 102 धावांची खेळी उभारली.
भारतीय संघाला चेन्नईत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरली आहे. या मालिकेत जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्याच्या अनुपस्थिती टीम इंडियाला चांगलीच जाणवत आहे.