राजकीय वार्तापत्र : राहुल इंगळे
जामनेर | गेल्या पाच टर्मपासून येथून विजयी होणारे आणि सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री असलेले ना. गिरीश महाजन येथून सत्ताधारी भाजपाचे उमेदवार आहेत. आपल्या गावात तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या आवर्जून संपर्कात राहणारे आणि सतत उत्साहाने सळसळणारे महाजन मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आरोग्यदूत म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच प्रतिमेने त्यांना आजवर सलग पाच वेळा येथून विजयी केले आहे. याही वेळी त्यांचेच पारडे येथून जड असून त्यांचे विरोधक त्यांच्याशी टक्कर देऊ शकेल, अशा उमेदवाराचा अजूनही शोध घेत आहेत. तसे प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे. पण कोण पक्षश्रेष्ठींना प्रभावित करू शकतो, त्यावरच उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते ठरणार आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मुंबईत हक्काचा उपचार मिळवून देणारे ना.महाजन यांनी याच प्रतिमेवर आज कॅबिनेट मंत्रीपद मिळवले आहे. त्याचवेळी त्यांनी आपली योग्यता सिद्ध करीत अनेकदा आपला पक्ष व मुख्यमंत्री यांच्यासाठी अडचणीत मार्ग काढून ‘संकटमोचन’ ही उपाधीही मिळवली आहे. त्याचवेळी निवडणूक आल्यावर उमेदवाराचा शोध घेणारे विरोधक मात्र ना. महाजन यांच्याप्रमाणे जनसेवा करून जनतेच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतांना दिसून आलेले नाहीत. एकाही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी तशी प्रेरणा घेतली नाही, त्यामुळे सध्या तरी तेथे महाजन यांना तगडे आव्हान देण्याच्या स्थितीत कुठलाच पक्ष नाही.
आता प्रश्न राहतो तो, गटातटाच्या गणितांचा, युती-आघाडी बनण्या-बिघडण्याचा, उमेदवारी न मिळणाऱ्या नाराज इच्छुकांचा आणि प्रमुख पक्षांची मते खाऊ शकणाऱ्या अन्य पक्षांचा, शिवाय जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व आपल्याकडेच असावे यासाठी एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या अंतर्गत आणि विरोधक नेत्यांच्या छुप्या भूमिकांचा. अशा वेळी नेमके कोण-कुणासोबत राहते, कोण वेगळे होते, कोण उमेदवारी न मिळाल्यावर अपक्ष उभे राहतो, कोण कुणाला निव्वळ मते खाण्यासाठी उभे करतो ? या सगळ्या धुमश्चक्रीनंतर ऐनवेळी मतदारांना कुणाची भूमिका भावते ? त्याची सरशी होणार आहे. बहुजन वंचित आघाडीने येथे आपले कार्यालय थाटले आहे. त्याचवेळी मनसेनेही निवडणुकीत उतरण्याचा पवित्रा घेतला आहे. हे दोन्ही पक्ष कॉंग्रेस आघाडीलाच डोकेदुखी ठरणारे आहेत. गेल्यावेळी मनसेने तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांना उमेदवारी दिली होती, या ही वेळी ते इच्छुक आहेत.
गेल्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती, तेव्हा या मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला क्रमांक दोनची मते पडली होती. त्यावेळी डिगंबर केशव पाटील हे त्यांचे उमेदवार होते. आताही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. सगळ्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी पाठपुरावा चालवलेला आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केली असली तरी मतदारसंघांची वाटणी झाली नसल्याने दोन्ही पक्षांचा एकमेकांच्या मतदार संघांवर डोळा आहे. त्यामुळे वाटणीत हा मतदार संघ कुणाच्या वाटेला येतो, ते निश्चित नसल्याने दोन्ही कडचे इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अशा परीशितीत ऐनवेळी मतदार संघ कुणाकडे जातो, अनेक इच्छुकांमधून कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, कोण बंडखोरी करतो, कोण नाराज राहून विरोधकांना मदत करतो. अन्य पक्षांचे उमेदवार किती मते खातात ? यावर आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या कॉंग्रेसकडून गेल्या वेळेच्या उमेदवार ज्योत्स्ना सुनील विसपुते, अन्य स्थानीक पदाधिकारी शंकर शिवलाल राजपुत, पुंडलिक पाटील व मदनलाल राठोड हे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषद सदस्य संजय गरूड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जळगावचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी उपनगराध्यक्ष जावेद मुल्लाजी, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, युवक शहराध्यक्ष विनोद माळी व शिवराज गरूड हे इच्छुक आहेत. यातून कुणाचे नाव अखेरीस नक्की होते ते लवकरच समजणार आहे.