चोपडा मतदार संघ : शिवसनेचा उमेदवार ठरल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार !

144373f4 f42f 41a6 a922 e68486453de8

 

चोपडा (प्रतिनिधी) कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला चोपडा मतदार संघ मागील दहा वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतू विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे घरकुल प्रकरणात कारागृहात गेल्यामुळे शिवसेना नेमकी कुणाला उमेदवारी देते, यावर पुढील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांचा प्रचार सुरु केल्यामुळे तूर्त राष्ट्रवादीचे पारडे जड आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो. चोपडा विधानसभा मतदारसंघ मध्यप्रदेशच्या सीमेलगत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील काही भाग म्हणजे किनगाव, साकली सर्कलचा परिसर या मतदारसंघात येतो. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अरुणभाई गुजराथी यांनी तब्बल चार वेळा चोपडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर कैलास पाटील यांनी गुजराथी यांचा पराभव केला. पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव झाला आणि २०१४ साली शिवसेनेचे प्रा. चंद्रकांत सोनवणे हे विजयी झाले.

 

चोपडा विधानसभा मतदारसंघात आदिवासी, कोळी, तडवी समाज प्रामुख्याने असून या समाजाची विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका राहिली आहे. येथे शेतकरी, शेत मजूर आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे वारे या मतदारसंघात वाहू लागले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आहे. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप सोनवणे हेदेखील या मतदारसंघात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माधुरी किशोर पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. मात्र यावेळी त्यांना पुन्हा संधी दिली तर लढण्याची तयारी देखील आहे.

 

चोपडा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वजन अधिक प्रमाणावर आहे. 2009च्या विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जगदीशचंद्र वळवी निवडून आले होते. मोदीची लाटेट जगदीश वळवी यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि तिसऱ्या क्रमांकवर फेकले गेले. परंतू आता ते राष्ट्रवादीत परतले आहेत. मध्यंतरी चोपड्याची जागा भाजपाला सुटणार असल्याची चर्चा देखील नगरीकांकडून होत होती. मात्र, शिवसेनेच्या तिकीटावर उभे असलेले प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी निवडणुकीत अनपेक्षितपणे बाजी मारली होती.

 

विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेनेतर्फे पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, गेल्या 29 ऑगस्ट रोजी घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यामुळे ते निवडणुकीतून बाहेर फेकले गेले आहेत. माजी आमदार कैलास पाटील आणि शिवसेनेच्या नेत्या इंदिराताई पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. चोपडा मतदारसंघ राखीव असल्याने आता शिवसेना कोणत्या दमदार आणि वजनदार व्यक्तीला तिकीट देते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आ.चंद्रकांत सोनवणे यांचे पत्ता कट झाल्याने भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अधिकचे सक्रिय झाले आहेत.

 

भाजपची स्थिती येथे मध्यमप्रमाणावर असल्याने युती झाली नाही, तर प्रभाकर सोनवणे, गोविंद सैंदाणे ही नावे चर्चेत आहेत. या उमेदवारांनी तयारी देखील केली असून भाजपाच्या प्रचारासाठी ते मतदारसंघातील गावोगावी फिरत आहे. मागील २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार चंद्रकांत बारेला यांनी २४ हजारपेक्षा मते मिळाली होती. तर काँग्रेसकडून उमेदवार ज्ञानेश्वर रायसिंग भादले हे रिंगणात होते. त्यांना 10 हजार मते मिळाली होती. जरी भाजपा आणि शिवसेना यांची युतीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली. तरी काँग्रेस आणि राष्ट्रीवादी काँग्रेस यांची मात्र आघाडी झाली असून दोघांना एकमेकांच्या मदतीने राजकीय बळ मिळाले आहे. इकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे अरुणा संजीव बावीस्कर या मतदारसंघात इच्छुक असून त्यांनीदेखील विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.

 

चोपडा हा मतदारसंघ कोणाला विजयी करेल या प्रश्नाचे उत्तर आजच्या घडीला कुणाकडेच नाही. विद्यमान आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना वगळता माजी आ.जगदीशचंद्र वळवी, चंद्रकांत बारेला यांच्यातच विजयासाठी खरा संघर्ष होणार असल्याची चर्चा चोपडा मतदारांमध्ये आहे. शिवसेना-भाजप यांची युती झाली नाही. तर भाजपचा कोणता उमेदवार येथे असेल हे सर्वस्वी भाजपाचे पक्षश्रेष्ठी यांच्यावर अवलंबून राहणार आहे.

2014च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते

चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) – ५४ हजार १७६
माधुरी पाटील (राष्ट्रवादी) – ४२ हजार २४१
जगदीशचंद्र वळवी (भाजपा) – ३० हजार ५५९
चंद्रकांत बारेला (अपक्ष) – २४ हजार ५०६
ज्ञानेश्वर रायसिंग भादले (कॉंग्रेस) – १० हजार २८०

Protected Content