अडावद आरोग्य केंद्रांतर्फे सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थ्यांची सिकलसेल रोगाची तपासणी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अडावद आरोग्य केंद्राकडून इयत्ता १० वीच्या व इतर सर्वच मुला-मुलींची सिकलसेल रोगाची तपासणीसाठी रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले.प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय पाटील यांनी मुलांना सिकलसेल आजाराविषयी सविस्तर माहिती दिली.तसेच प्र.आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी देखील सिकलसेल रोगांची सम्पूर्ण माहिती व मार्गदर्शन केले.

सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग आहे. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. मध्य भारतात, काही विशेष जाती-जमातीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. हा रोग आनुवंशिक परंपरेचा आहे. पुरातन काळात मलेरिया या रोगापासून बचाव करण्यासाठी मानवाच्या जनुकांमध्ये काही बदल झाले. आपल्या पेशींमध्ये गुणसूत्रांची (जनुक ज्यात स्थित असतात असे क्रोमोझोम्स) जोडी असते. एक आईकडून गुणसूत्र येते तर दुसरे पित्याकडून. एका गुणसूत्रातील जनुकात बदल झाल्यास मलेरियापासून बचाव होतो, परंतु असा बदल झालेला दुसराही गुणसूत्र असल्यास मात्र रोगच उत्पन्न होतो. एक गुणसूत्र बदलले की त्याला ‘ट्रेट’ किंवा ‘कॅरिअर’ म्हणतात.

सिकलसेल म्हणजे काय.?
सिकल सेल हा आजार ‘सिकल पेशी रक्तक्षय’ किंवा ‘ड्रेपॅनोसायटोसिस’ (ग्रीकःdrepane- विळा, kytos-पेशी) या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते.

सिकलसेल रोग कशामुळे होतो?

सिकलसेल हा अनुवांशिक रोग आहे जो जनुकातील दोषामुळे होतो. एखादी व्यक्ती सिकलसेल आजाराने जन्माला येते तेव्हाच दोन जीन्स वारशाने मिळतात-एक आईकडून आणि एक वडिलांकडून. ज्या व्यक्तीला फक्त एक जनुक वारसा मिळाला आहे तो निरोगी आहे आणि तो रोगाचा “वाहक” आहे.

प्रौढांमध्ये, हातातील रक्तवाहिनीतून रक्ताचा नमुना घेतला जातो. लहान मुले आणि बाळांमध्ये, रक्ताचा नमुना सहसा बोट किंवा टाचमधून गोळा केला जातो. त्यानंतर नमुना हिमोग्लोबिनच्या सिकल सेल फॉर्मसाठी तपासणीसाठी प्रयोगशाळेत जातो.सदर तपासणी शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी-डॉ.अर्चना पाटील, डॉ. अक्षय पाटील, विजय देशमुख, आरोग्य सहाय्यिका-शोभा चौधरी, आरोग्य सेवक-कैलास बडगुजर, संतोष भांडवलकर, राजेंद्र पाटील, हिंद लॅबचे टेक्निशियन-सचिन माळी, आदींनी परिश्रम घेतले.

सिकलसेल रोगाच्या तपासणी करणेकामी आता पर्यंत २४२ च्या वर रक्तनमूने गोळा करण्यात आले आहेत.अजूनही पुढे उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांचे रक्तनमूने तपासणी साठी घेण्यात येणार आहेत.सदर तपासणी शिबीराच्या यशस्वी तेसाठी… सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक-अशोक कदम सर, वर्गशिक्षक-विजय पानमन सर, व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

Protected Content