लोहारा येथे विज्ञान मेळावा उत्साहात

lohara

 

फैजपूर प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP) आणि विज्ञान प्रसार नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आदिवासी मुलांसाठी दोन दिवशीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून धनाजी नाना महाविद्यालयाच्या सहकार्याने सातपुडा विकास मंडळ पाल संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा, लोहारा येथे आज (दि.22) उत्साहात पार पडला.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविल्या तर देशाच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा असेल, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखून सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे व्यासपीठ उपलब्ध करून देईल असे मत माननीय कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात लोहारा आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर करत वटवृक्षाची पूजा करण्यात आली. त्यानंतर खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि श्रध्देय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी बाल विज्ञान मेळाव्याचे समन्वयक प्रा.डॉ.सतीश चौधरी यांनी केले. आदिवासी भागातील मुलांच्या जाणिवा समृद्ध करणे आणि बालवयापासूनच विज्ञानाची आवड वृद्धिंगत करणे, हा हेतू या कार्यक्रमाच्या आयोजनामागील आहे, असे समन्वयक चौधरी यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे कौतुक करीत जे काम आपल्याला साठ वर्षात करता येणे शक्य नाही, ते ही आदिवासी मुले फक्त सहा वर्षात पूर्ण करू शकतील. मात्र त्यासाठी अद्ययावत सोयीसुविधा आणि अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यावेळी दिलीप पाटील, राज्यपाल, नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी सांगितले की, स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनीच आदिवासी भागात शिक्षणाचे बीजारोपण केले. शिक्षणासोबतच संस्कारांची जोड असणे आवश्यक आहे. विद्यापीठाच्या योजना आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि तसे झाल्यास समाज विकासाला हातभार लागेल. स्थानिकांच्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले.

यांची होती विशेष उपस्थिती
या कार्यक्रमाचे उद्घाटन कबचौ उमविचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते झाले. तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर चौधरी होते. तसेच विशेष अतिथी म्हणून दिलीप पाटील, डॉ.अजित पाटणकर, सल्लागार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई समन्वयक प्रा.डॉ.एस.टी बेंद्रे, कबचौ उमविचे दीपक पाटील, नितीन बारी, अजित पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, डॉ.अरुणा चौधरी, जीवन पाटणकर, प्रा.डॉ.के.जी.कोल्हे, सिनेट सदस्य प्रभात चौधरी, सचिव जनता शिक्षण मंडळ खिरोदा, धनंजय चौधरी, सुधाकर झोपे, लियाकत जमादार, सरपंच लोहारा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी घेतली मेहनत
बाल विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत कुलगुरू आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले. त्यांनी अशा कार्यक्रमात धनाजी नाना महाविद्यालय सदैव एक पाऊल पुढे राहील असे आश्वासन दिले आणि भविष्यात या उपक्रमाचे यश निश्चित दिसेल अशी हमी दिली. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा राजश्री नेमाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य केले.

Protected Content