Home Cities अमळनेर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विज्ञान प्रदर्शन: विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन

आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विज्ञान प्रदर्शन: विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन


यावल/अमळनेर-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जिल्हा जळगाव अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा भव्य आणि यशस्वी कार्यक्रम १५ जानेवारी २०२५ रोजी अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे, तालुका अमळनेर येथे उत्साहात पार पडला. या प्रदर्शनात १७ शासकीय आणि ३४ अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उपकरणे सादर केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अरुण पवार (प्रकल्प अधिकारी, यावल) यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात पवार यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व समजावले आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्यांनी जाहीर केले की प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर नेले जाईल, ज्यामुळे त्यांना अवकाश संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला.

कार्यक्रमात उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करून प्रत्येक गटातील चार बीटमधून सर्वोत्तम तीन उपकरणांची निवड करण्यात आली होती. या प्रदर्शनात अनुक्रमे १४, १२, आणि २६ उपकरणांचा सहभाग होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भव्य आविष्कार पाहायला मिळाला. समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान प्राचार्य अनिल झोपे यांनी भूषवले. आपल्या प्रेरणादायी भाषणात झोपे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील नाविन्यपूर्णता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले आणि प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.

झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रम शाळांसाठी शैक्षणिक मदत आणि सुधारणा यासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळेल असे सांगून अशा कार्यक्रमांच्या सातत्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तीनही गटातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया, यावल यांच्या वतीने इन्सिनेटर भेट देण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्रकुमार सिंग (क्षेत्रीय व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, जळगाव), राधेश्याम ताराचंद मूंगमुळे (शाखा व्यवस्थापक, यावल), डॉ. सी. डी. साळुंखे (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट जळगाव), सौ. विद्याताई पाटील (अध्यक्ष, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे), श्री युवराज पाटील (सचिव, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे) उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या निरीक्षण व मूल्यांकनासाठी विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे (माध्यमिक विद्यालय, वावडे, अमळनेर), बी. बी. ठाकरे (साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, अमळनेर) आणि डी. के. पाटील (जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर) यांनी काम पाहिले. या यशस्वी आयोजनामागे पवन पाटील (सहाय्यक प्रकल्प अधिकारी) आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलच्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच अनुदानित आश्रम शाळा, पिंपळे येथील कर्मचारी यांचे विशेष योगदान होते.


Protected Content

Play sound