नाशिक वृत्तसंस्था | नाशिक येथे संपन्न होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर हे नाशिक येथे सुरु असलेल्या साहित्य संमेलनात ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजीकरण’ या एका परिसंवादाचे अध्यक्ष होते. परिसंवादात जयदेव डोळे, विश्वंभर चौधरी, अपर्णा वेलणकर आणि डॉ.हरी नरके संवाद साधणार होते. परिसंवादात सहभागी सहभागी होण्याआधीच गिरीश कुबेर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात अवमानकारक आणि चुकीची माहिती लिहिल्याबद्दल ही शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, ”छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिहिलं गेलं असल्यामुळे शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही” असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या कृत्याचं समर्थन केलं मात्र ”अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत शाईफेक करणे योग्य नाही” असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत सदर कृत्य अयोग्य असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर संमेलनात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.