सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । जुना वाद उकरून काढत येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना धमकावून त्यांची सोन्याची चेन हिसकावल्याची घटना येथे घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील मयूर कैलास खंडेलवाल याच्या विरूध्द एका प्रकरणातून गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, काल रात्री दिवाळीनिमित्त वानखेडे व त्यांचे कुटुंबिय हे देवदर्शनासाठी जात असतांना गांधी चौकात मयूर खंडेलवाल याने त्यांना पाहून घेण्याची धमकी दिली.
तसेच याप्रसंगी झालेल्या धक्काबुक्कीत मयूर खंडेलवाल याने वानखेडे यांच्या गळ्यात असलेली १७ ग्रॅम वजनाची व सुमारे ६८ हजार रूपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. या अनुंषंगाने वानखेडे यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार सावदा पोलीस स्थानकात भाग ५ गुरनं ५०/२०२० भादंवि कलम ३९२, ५०४ व ५०६ अन्वये मयूर कैलास खंडेलवाल (रा. स्वामीनारायण नगर, सावदा) याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि डी. डी. इंगोले हे करत आहेत.