सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी । राष्ट्रीय स्तरावरील कोविड-१९च्या कोविड-१९ पॅनडॅमीक अॅन अॅप्रोप्रिएट बिहेवियर या राष्ट्रीय स्तरावरील समितीवर सावदा येथील ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अतुल सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली असून ही आपल्या राज्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशी बाब मानली जात आहे.
याबाबत वृत्त असे की, आयसीएमआर आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने आज कोविड-१९ पॅनडॅमीक अॅन अॅप्रोप्रिएट बिहेवियर या राष्ट्रीय स्तरावरील कमिटीचे गठन करण्यात आले आहे. या समितीत देशभरातील ख्यातनाम डॉक्टर्सचा समावेश आहे. याच्या अध्यक्षा डॉ. मंजू शर्मा असून अन्य सदस्यदेखील खूप तोलामोलाचे व प्रतिष्ठीत आहेत.
या समितीवर सावदा येथील ख्यातनाम फिजीशियन डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही समिती कोविडशी संबंधीत अतिशय महत्वाची असून याची पहिली बैठक २ जून रोजी होणार असल्याची माहिती आज अतुल सरोदे यांना अधिकृतपणे पुरविण्यात आलेली आहे.
डॉ. अतुल सरोदे हे दिवंगत माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे सुपुत्र असून ते अव्याहतपणे सावद्यासह परिसरातील जनतेला वैद्यकीय सेवा प्रदान करत आहेत. कोविड-१९ विषयक केंद्रीय समितीवर निवड झाल्याने डॉ. अतुल सरोदे यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.