सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खुन करून तब्बल १२ वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला सावदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. जालिंदर पळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सावदा पोलीस स्टेशन भाग ०५ गु.र.नं ५१/२०१० भा.द.वि क ३०२,३०७,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यात सुमारे १२ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे प्रकाश भिवसन उर्फ भूषण भोई रा. सावदा हा सावदा शहरातील भोईवाडा परीसरात लपुन बसलेला आहे. अशी माहीती मिळाली होती.
या माहितीवरून जालींदर पळे यांनी लागलीच पोउपनि विनोद खांडबहाले, सफी / १२८४ पांडुरंग सपकाळे, पोना/ १६१६ यशवंत टहाकळे, पोना / १५५३ अक्षय हिरोळे, पोहेकॉ / १२३९ उमेश पाटील, पोना / २४८६ मेहबान तडवी, पोना / १८४२ देवेंद्र पाटल, पो. कॉ/२१२५ बबन तडवी, पो.कॉ/२१०० संजय तडवी अशा पोलीस अंमलदाराचे पथक तयार करुन त्याना सावदा शहरात भोईवाडा परिसरात रवाना होवुन परीसरात सदर आरोपीताचा शोध घेण्यास सांगितले.
यानुसार पथकाने या ठिकाणी छापा मारला. आरोपी प्रकाश भिवसन उर्फ भूषण भोई यास पथकातील पोलीसांचा संशय आल्याने तो लपलेल्या जागुन बाहेर निघुन पळु लागला. त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व वर नमुद पथकाचे मदतीने पोलीस स्टेशन आणुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सावदा पोलीस स्टेशन चे सपोनि जालींदर पळे व सहकारी करित आहेत.
सावदा शहरातील फिर्यादी सौ. सुनिता प्रकाश भोई (मयत) वय ३५ रा. सावदा ही प्रकाश भिवसन उर्फ भुषण भोई रा. सावदा याचेसह टेलिफोन ऑफिस जवळील झोपडपट्टीतील वास्तव्यास होती. दि.०६/०६/२०१० रोजी सावदा शहरात टेलिफोन जवळील झोपडीत फिर्यादी सुनिता भोई ही स्वयंपाक करित असताना यातील आरोपी नामे प्रकाश भिवसन उर्फ भुषण भोई रा. सावदा हा दारु पिऊन आला. तेव्हा फिर्यादी त्यास बोलली की तुम्ही नेहमी दारु पितात, घरचे वस्तु विकतात तुम्ही घराचे पत्रे सुध्दा विकले याचा आरोपीस राग आल्याने प्रकाश भोई याने फिर्यादीस चापटा बुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी सुनिता हिचे अंगावर रॉकेल टाकुन तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिले. यामुळे तिला गंभीर दुखापत होवु ती मरण पावल्याने सावदा पोलीस स्टेशन भाग ०५ गु.र.नं ५१/२०२२ भा.द.वि क ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घडल्यापासुन आजपावेतो सदर आरोपी हा फरार झाला होता. त्यास पकडण्यास १२ वर्षांनी पोलीसांना यश आले आहे.