जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सनातन धर्म व भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी समाजाने आध्यात्मिक मार्ग स्वीकारणे अत्यंत आवश्यक असून सत्संग व भगवत कथा ही त्याची प्रभावी साधने आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन परमपूज्य सुखदेव चैतन्य जी महाराज यांनी केले. जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे आयोजित पाच दिवशीय गीता, रामायण व भागवत कथा सत्संगाच्या निमित्ताने ते बोलत होते.
या कथासत्राच्या प्रारंभी त्यांनी सनातन धर्माची महान परंपरा, मूल्ये व जीवनशैली यांचे महत्त्व विशद केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस अध्यात्मापासून दूर जात असल्याने सामाजिक व वैयक्तिक समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्संगाच्या माध्यमातून माणसाच्या मनात सकारात्मक विचार, सदाचार व संयम निर्माण होतो, त्यामुळे समाज सुदृढ बनतो, असे त्यांनी सांगितले.

भगवत कथा व गीतेच्या उपदेशातून व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देत महाराजांनी तरुण पिढीला विशेष आवाहन केले. व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कर्तव्य आणि चारित्र्यनिर्मितीवर भर देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामाजिक विकास साधता येतो आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून जीवन जगल्यास खरा आनंद व समाधान मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पाच दिवशीय कथासत्रात रामायण व भागवत पुराणातील विविध प्रसंगांचे सखोल विवेचन करण्यात आले. कथा, कीर्तन व भजनांच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना धर्म, संस्कृती व नैतिक मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. गावातील नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेतला.
आज या भगवत कथा सत्संगाचा समारोप होत असून समारोपप्रसंगी विशेष प्रवचन व आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून समाजात सद्भावना व एकोपा वाढीस लागल्याचे चित्र दिसून येत आहे.



