मोहरदच्या सरपंच अंजुम तडवींची दिल्लीतील राष्ट्रीय ‘सरपंच संवाद’ प्रशिक्षणासाठी निवड 

0
195

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील मोहरद गावाला अभिमानाची बाब ठरली आहे. गावाच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी यांची दिल्ली येथे होणाऱ्या देशभरातील निवडक महिला सरपंचांसाठी आयोजित चार दिवसीय ‘सरपंच शक्ती – सरपंच संवाद’ प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने १६ ते १९ डिसेंबरदरम्यान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातील एकमेव प्रतिनिधी म्हणून तडवींची निवड झाल्याने परिसरात उत्साहाचं वातावरण आहे.

या प्रशिक्षणासाठी देशभरातून केवळ ५९ महिला सरपंचांची निवड झालेली आहे. ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पातळीवर कसे पुढे नेता येईल, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर कसा करता येईल, तसेच सरपंच संवाद उपक्रमाद्वारे विकासाची दिशा कशी ठरवता येईल याबाबत खास सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात शासनाच्या संकल्पनांची अंमलबजावणी, प्रभावी संवादकौशल्य आणि ग्रामविकासातील नव्या शक्यतांवर भर देण्यात येणार आहे.

चार दिवसांच्या निवासी प्रशिक्षणात संसद भवन भेट, गती शक्ती संग्रहालय दर्शन, महिला विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती तसेच केंद्रीय मंत्री आणि विविध राजकीय नेत्यांशी थेट संवाद ही मुख्य आकर्षणे असतील. ग्रामविकास अधिक सक्षम करण्यासाठी आणि पंचायतराज व्यवस्थेत महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.

आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सरपंच अंजुम तडवी म्हणाल्या की, “ग्रामविकासात महिलांचा सहभाग वाढवणे, महिला सशक्तीकरणासाठी योजनांची अंमलबजावणी आणि पंचायत सक्षमीकरण या बाबींवर आमच्या ग्रामपंचायतीत सातत्याने काम सुरू आहे. या प्रशिक्षणातून मिळालेली माहिती माझ्या पंचायतीतील महिला विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.” मागील वर्षी ‘पंचायतचे पार्लमेंट’ कार्यक्रमासाठीही त्यांची दिल्लीला निवड झाली होती, ही दुसरी निवड असल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांचे तसेच ग्रामविकास अधिकारी पंकज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचेही त्यांनी सांगितले.