पुणे प्रतिनिधी । खासदार संभाजी राजे यांनी सारथीसाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. सारथीवरून सचिव जे.पी. गुप्ता यांना हटवण्यासह त्यांचे सर्व जीआर रद्द करण्यात येतील. तसेच सारथीची स्वायत्तता टिकवणार असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदेंच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असेही शिंदेंनी यावेळी सांगितले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले होतं. यावेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले होते. खासदार संभाजीराजे यांच्यासोबत सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसले होते. सारथीबाबत सनदी अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी काढलेले सर्व जीआर मागे घेत असल्याचे सांगून गुप्ता यांना तात्काळ पदावरून दूर करण्यात येत आहे, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदे यांनी उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजेंची आणि उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) लादलेल्या निर्बंधांविरोधात मराठा क्रांती मोर्चाने उपोषणास्त्र उगारलं होतं. ‘सारथी’ संस्थेची व्यथा मांडण्यासाठी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आगरकर रस्त्यावरील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते.