भुसावळातील सत्ताधार्‍यांची राजकीय द्वेषापोटी कारवाई- संतोष चौधरी

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळातील जनआधारच्या चार नगरसेवकांवर केलेली कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आली होती असा आरोप आज माजी आमदार संतोष चौधरी यांनी केला.

भुसावळ नगरपालिकेतील जनआधार आघाडीचे गटनेते उल्हास पगारे यांच्यासह नगरसेवक रवी सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे आणि संतोष चौधरी (दाढी) यांना तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून निलंबीत करण्याची शिफारस केली होती. या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी त्यांना अपात्र केले होते. तसेच त्यांना पाच वर्षांपर्यंत कोणतीही निवडणूक लढविता येणार नसल्याचेही या निकालात नमूद करण्यात आले होते. यामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. याच्या विरोधात या चारही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. तेथे यावर सुनावणी झाल्यानंतर आज या चौघांना दिलासा मिळाला. या पार्श्‍वभूमिवर, या निकालानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल केला.

या पत्रकार परिषदेत संतोष चौधरी म्हणाले की, २१ फेब्रुवारी रोजी शासनाने आपली ऑर्डर मागे घेतली. यामुळे आधीचा निकाल हा राजकीय द्वेषापोटी घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे याच्याच दुसर्‍या दिवशी म्हणजे २२ रोजी मिटींगची सूचना दिली असून याचा अजेंडा देण्यात आलेला आहे. मात्र जनआधारच्या चौघा नगरसेवकांना अजेंडा देण्यात आलेला नाही. यामुळे २८ ची मिटींग बेकायदेशीर आहे. ही सभा रद्द करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

Add Comment

Protected Content