
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये राजकीय वातावरण रंगतदार होऊ लागले आहे. याच प्रभागातून माजी नगरसेवक संतोष प्रल्हाद कोळी उर्फ बबलू यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रणशिंग फुंकले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसह दाखल होताच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अर्ज सादर केल्यानंतर बोलताना संतोष कोळी यांनी प्रभागातील सुरू असलेल्या विविध प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आश्वासन दिले. “गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी आणि जनसेवेसाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. मला प्रभागातील जनतेचा विश्वास आणि पाठिंबा मिळेल, अशी मला पूर्ण खात्री आहे,” असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक म्हणून पूर्वी केलेल्या कामांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, प्रशासनातील प्रक्रियेची जाण, विकासकामांना मंजुरी आणण्याचा अनुभव आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला दुवा यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरिकांसाठी मूलभूत सुविधा या विषयांना प्राधान्य देणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, संतोष कोळी यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय समीकरणे नव्याने रंगत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या प्रवेशाने निवडणुकीची चुरस अधिक वाढेल, अशी स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठीही ही उमेदवारी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



